ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22 - जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या पाश्र्वभूमीवर पाहणी करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) पथकाने जिल्हा रुग्णालयात करण्यात येत असलेल्या पूर्ततेची मंगळवारी पाहणी केली. ‘सरप्राईज व्हिजिट’ असलेल्या या पाहणीदरम्यान पथकाने काय निष्कर्ष काढले याबाबत मात्र पथकाने बोलण्यास नकार दिला. आपला अहवाल दिल्ली येथे परिषदेकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जळगावात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथे विविध कामांना वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पुरेसा सुविधा असणे गरजेचे असून त्या असल्या तरच मान्यता मिळते. त्यानुसार पाहणी करण्यासाठी हे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले. समितीचे अध्यक्ष डॉ.एच.सी. विश्वनाथ, डॉ.पंकज गुप्ता व डॉ.चतुर्वेदी यांचा समावेश असलेल्या या पथकाने सोमवारप्रमाणे मंगळवारीदेखील पाहणी केली. यामध्ये डॉक्टरांसह विविध पदे भरलेली आहे की नाही, प्रात्यक्षिक कक्ष, पुरेसी जागा, प्रत्येक विषयासाठी वर्गखोल्या आहेत की नाही याची पाहणी पथकाने केली. यामध्ये गेल्या आठवडय़ातच 19 पदे भरले गेल्याने ही बाब पाहणी दरम्यान सकारात्मक ठरल्याचे समजते.
काय आहे ‘सरप्राईज व्हिजिट’?वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेने काही नियमावली ठरून दिली आहे. त्यानुसार सर्व पूर्तता असली तरच मान्यता मिळते. यामध्ये महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी करण्यात येत असलेल्या पूर्ततेची पाहणी करण्यासाठी पथक येते. विशेष म्हणजे हे पथक पूर्वसूचना न देता येते. त्यामुळे त्यास ‘सरप्राईज व्हिजिट’ संबोधतात. या मध्ये पहिल्या भेटीत ज्या त्रुटी आढळल्या त्या दुस:या भेटी दरम्यान पूर्ण करायच्या असतात. असेच साधारण तीन ते चार ‘सरप्राईज व्हिजिट’ होतात. या दरम्यान सांगितलेले बदल पूर्ण झाले नाही तर मान्यता मिळत नाही, असे नियमच परिषदेने ठरवून दिले आहे.
बोलण्यास नकारमंगळवारी पथकातील सदस्यांशी चर्चा केली असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. या बाबत गुप्तता असते, असे सांगून त्यांनी बोलणे टाळले. पथक आपला अहवाल दिल्ली येथे परिषदेला सादर करणार आहे.