मार्गदर्शन मागविणार
जळगाव : कार्यारंभ आदेश न दिलेल्या योजनांअंतर्गतच्या कामांचा निधी थांबवावा, अशी मागणी जि. प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत झाल्याने यात महिला व बालकल्याण विभागाचा पूर्णत: निधी थांबविला जाऊ शकतो. अशा स्थितीत महिला आयोग व शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवून नवीन निधी मागविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सदस्यांचा सत्कार
जळगाव : जिल्हाभरातनू नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा बारा बलुतेदार महामंडळातर्फे ७ फेब्रवारी रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्यांनी नावे कळवावीत, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत ईश्वर मोरे, मुकुंद मेटकर, राजकुमार गवळी, चंद्रशेखर कपडे, रवींद्र बोरनारे, सागर सपके, मनीष कुंवर, भारती कुमावत, छाया कोरडे, आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीची आज बैठक
जळगाव : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामीण अशा दोन बैठकांचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. यात शहर आघाडीची सकाळी ११ वाजता तर ग्रामीण आघाडीची दुपारी १ वाजता बैठक होणार आहे.
सीसीसीत ८ रुग्ण
जळगाव : कोविड केअर सेंटरमध्ये सध्या केवळ ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे एकत्रीकरण करण्यात आले असून, कोविड केअर सेंटर बंदच करण्यात आल्याचे चित्र आहे. शहरातही इकरा महाविद्यालयात असे रुग्ण हलविण्यात आले आहेत.
वाहनांना पुन्हा मुभा
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे नाशिक येथे बैठकीला गेल्यानंतर एकाच दिवसात नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र होते. वाहने पार्किंगला न लावता आवारात कुठेही फिरविण्याची मुभा दिली जात होती. वाहने अडविण्याची काठीच काढून टाकून थेट वाहने आत सोडण्यात येत असल्याचे चित्र गुरुवारी होते. नियम काही दिवसांसाठीच का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.