नशिराबाद : महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असले तरी जळगावकडून नशिराबाद येथे गावात शिरण्याकरता फार कसरत करावी लागत आहे. या विषयी तक्रारी होत असल्याने मंगळवारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नशिराबादला भेट देत या संदर्भात पाहणी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, विनायक धर्माधिकारी, देविदास माळी, विनोद पाटील, ललित ब-हाटे, सोपान रोटे, भूषण पाटील, डॉ. प्रमोद आमोदकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा व त्यांच्या समवेत महामार्ग तंत्र विभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. गावात बस स्थानकावर बस येत नसल्याची तक्रारही याप्रसंगी करण्यात आली. गावात रोडवरील दुभाजकामुळे गावात शिरण्याकरता मार्ग नसल्यामुळे रोडचा ट्रॅकक्राॅस करणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या कसरती व अडचणी लक्षात घेत लवकरच मार्ग काढून देतो,अशी ग्वाही प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी नागरिकांना दिली.