चोपडा, जि.जळगाव : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक आधार आपल्यामागे असतो म्हणजे आपले पालक होय. आपली मुलं मोठी व्हावी हे प्रत्येक पालकाला वाटत असते. पालकांनी मुलांना वाढताना मुलांचे केवळ गुणपत्रकावरचे गुण पाहू नये. तेथे गुण कमी असले तरी चालतील पण मुलांच्या अंगी असलेले इतर गुण, कौशल्य ओळखावे, त्यांच्या विकासासाठी त्यांना अभ्यासेतर उपक्रमांसाठी सतत प्रेरणा द्यावी, असा सल्ला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.नितीन उत्तमराव बारी यांनी उपस्थित पालकांना दिला.येथील बारीवाड्यातील श्री समस्त सूर्यवंशीय बारी पंच मंडळ, बारी समाज महिला मंडळ व नागवेल मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव महापालिकेच्या नवनियुक्त नगरसेविका शोभा बारी या उपस्थित होत्या. बारी पंच मंडळाचे अध्यक्ष किरण बारी, उपाध्यक्ष गिरीराज बारी, सचिव योगानंद बारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी बारी नागवेल मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश बारी, रावेर पंच मंडळाचे सदस्य बाळकृष्ण बारी, रावेर येथील वधुवर मेळाव्याचे अध्यक्ष योगेश पाटील, अरुण कोल्हे, निवृत्त शिक्षक एम. बी. बारी, निवृत्त नायब तहसीलदार गणेश बारी उपस्थित होते.प्रारंभी स्नेहल नागपुरे हिने प्रार्थना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका म्हणून निवड झाल्याबद्दल शोभा बारी यांचा, तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.नंतर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व शालोपयोगी साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर, रंगभरण, सामान्यज्ञान व वक्तृत्व स्पधेर्तील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच छाया बारी व बबन बारी यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन व प्रास्ताविक संजय बारी यांनी, तर आभार प्रदर्शन योगानंद बारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भगवान बारी, अजय बारी, जितेंद्र बारी, स्वप्नील बारी आदींनी परिश्रम घेतले.
मुलांना अभ्यासेतर उपक्रमांसाठी प्रेरणा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:24 PM