जळगाव : कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कचरा संकलनाच्या घंटागाडीत थेट कचऱ्याऐवजी माती व दगड भरल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास नगरसेवक अमर जैन यांनी उघडकीस आणला. हा प्रकार द्रौपदीनगरात घडला असून एकदा पुन्हा मनपा प्रशासनाला फसविण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
घंटागाडी घराघरातून कचरा संकलनासाठी वापरणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश वेळी कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी घंटगाडी चालकांकडून माती व दगड भरले जातात. यापूर्वीही असे दोन ते तीन प्रकार राजकीय व्यक्तींनी उघडकीस आणले होते. शनिवारी सकाळी द्रौपदीनगर भागात मातीच्या ढिगाऱ्याजवळ कचरा संकलनाच्या घंटागाडीमध्ये काही जण माती व दगड भरत होते. हा प्रकार एका वकिलाने पाहिला. त्यांनी लागलीच नगरसेवक अमर जैन यांना हा प्रकार कळविला.
वाहनातून खाली केली माती
घंटागाडीत माती व दगड भरले जात असल्याची माहिती कळताच, नगरसेवक अमर जैन यांनी लागलीच द्रौपदीनगरातील तो स्पॉट गाठला. यावेळी त्यांना वाहनात माती भरलेली दिसून आली. त्यांनी लागलीच फोटो काढून घेतले. नंतर वाहनावरील तरुणांना माती का भरत आहात, अशी विचारणा केली? त्यावर त्या तरुणांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनातून माती खाली करण्याचे सांगितले. काही वेळानंतर वाहनातील माती, दगड खाली करण्यात आले.
सहायक आयुक्तांना बोलविले...
अमर जैन यांनी लागलीच सहायक आयुक्त पवन पाटील यांना संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला व त्यांना बोलवून घेतले. तसेच संबंधित अधिकाऱ्याला बोलवून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी असाच प्रकार समोर आणला होता. तसेच याआधी आणखी दोन ते तीन प्रकार घडले असून त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले होते. हे प्रकार नित्याचेच झाले असल्यामुळे मनपा प्रशासन आता काय अॅक्शन घेणार, यावर लक्ष लागून आहे.