जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नव्याने होऊ घातलेल्या बृहत आराखड्याच्या अनुषंगाने तीन जिल्ह्यातील शिक्षण प्रेमींकडून १५ एप्रिलपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शासनाने ३१ मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत पाच वर्षांच्या कालावधीकरिता तयार होणाऱ्या बृहत आराखड्यासाठी थेट सूचना मागविल्या आहेत. सूचना मागविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लिंक दिली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी अंतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य,संचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ इत्यादींनी आपल्या सूचना १५ एप्रिल २०२३ पर्यंत वेबलिंक फॉर्ममध्ये भरून शासनास पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ पाहावे,असे विद्यापीठाच्या वतीने प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सांगितले.
विद्यापीठाने बृहत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम होती घेतले. प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, औद्योगिक आदी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तींशी संवाद साधून माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट राज्य शासनानेच सूचना मागवल्या आहेत.