वाघडू, ता. चाळीसगाव : जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, जि.प. हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या (डीबीटी) माध्यमातून रक्कम जमा करण्याकरिता विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत.
शासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र याकाळात विद्यार्थ्यांची बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने बँकांमध्ये गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
मागील वर्षापासून कोविड-१९चा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील सर्व शाळा बंद असून सन २०२०-२१च्या शासन आदेशानुसार जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कोरडा पुरवठा वाटप करण्यात आला आहे. मात्र आता भारत सरकारच्या निर्देशानुसार सन २०२१-२०२२ च्या शैक्षणिक वर्षांची उन्हाळी सुट्टीसाठी विद्यार्थ्यांना कोरडे धान्य वाटत न करता विद्यार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरचा (DBT)च्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्यात यावे. काढलेले बँक खाते आधार लिंक आहेत किंवा नाहीत, लिंक नसल्यास आधार लिंक करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांची बँक खाते उघडली नसल्यास त्यांचे आधार लिंक खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.