जळगाव : शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना विद्यापीठातर्फे महाविद्यालये व शैक्षणिक शाळा यांना देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीत विशाखा समितीच्या कामकाजाबाबत आढावा घेऊन प्रत्येक कार्यालयातंर्गत तक्रार निवारण समिती व जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसे पत्रही जारी करण्यात आले होते. त्यात ज्या कार्यालयांत १० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये समिती स्थापन करावी. अशा सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, तसेच खासगी कार्यालये यांनी समिती स्थापन करून त्याची माहिती महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात पाठवावी, असेही कळविण्यात आले होते. दरम्यान, या सूचनेचे पत्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून पाठविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व शाळांना महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच चौकशी समितींची नावे व कार्यवाहीचा अहवाल हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचेही कळविण्यात आले आहे.