जळगाव : मोबाईलच्या माध्यमातून होणारी कॉपी आणि पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केद्रांमध्ये जॅमर बसविण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (दिल्ली) देण्यात आल्या असून त्याबाबतचे पत्र उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे़ तसेच युजीसीने केलेल्या सूचनांची माहिती विद्यापीठाकडून महाविद्यालय व परिसंस्थांना कळविण्यात आली आहे़सावधगिरी म्हणून विद्यापीठ आणि महाविद्यालयकडून आधीच परीक्षा काळात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे़ तरी देखील काही कॉपी बहाद्दरांकडून मोबाईलचा छुपा वापर करून कॉपी केली केली जाते तर कधी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर फुटीचा प्रकार घडता़ त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रा़ रजनीश जैन यांनी परीक्षेच्यावेळी महाविद्यालयांमधील परीक्षा केद्रांवर जॅमर बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना विद्यापीठांना केल्या आहेत़विशेष म्हणजे, परीक्षा केद्रांमध्ये कोणत्या प्रकारचे जॅमर बसवावे याबाबतच्या मॉडेलची यशस्वीरित्या तपासणी करण्यात आली असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे़आयोगाच्या सूचनांची माहिती कळविलीविद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) विद्यापीठाच्या कुलगुरूंना व उच्च शिक्षण संहसचालक कार्यालयांना केलेल्या सूचनांचे पत्रक विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे़ परीक्षा काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीकडून केलेल्या सूचनांचे माहिती महाविद्यालयांना व परिसंस्थांना कळावी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून पत्र पाठविण्यात आले आहे़ तसेच विविध परवानगी घेण्यात आल्यानंतर परीक्षा केद्रांमध्ये आगामी काळाच्या परीक्षांपासून जॅमर बसविण्याच्या सूचनाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाण्याची शक्यता आहे़नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या!विद्यापीठ, महाविद्यालयांनी जॅमर बसविताना केंद्र सरकारच्या जॅमर धोरणाच्या नियमांची काटेकोटपणे अंमलबजावणी करण्याचेही विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्रकात नमूद केले आहे़ तसेच जॅमर बसविल्यानंतर परीक्षा केंद्र परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचीही सूचना केली आहे़
परीक्षा केद्रांमध्ये जॅमर बसविण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:57 PM