दादावाडी : नीलेश पाटीलसह चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याने विजयी उमेदवाराला घरी जाऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे नीलेश सुधाकर पाटील (रा.खोटे नगर) यांच्यासह चौघांविरुद्ध सोमवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील (३५, रा.श्रीराम नगर, दादावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१८ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. त्यात आपण विजयी झालो तर प्रतिस्पर्धी नीलेश सुधाकर पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे नीलेश पाटील हे तेव्हापासून सतत वाद घालून वारंवार शिवीगाळ करीत आहेत. १८ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घरी असताना नीलेश पाटील, सागर व त्याच्या सोबतचे ते दोन्ही जण असे चौघे जण घरासमोर आले. निवडणुकीत पराभव तसेच वाॅर्डात सुरू असलेल्या विविध विकास कामांना विरोध म्हणून या चौघांनी खाली ये,असे म्हणत अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी गल्लीतील भूषण वाघ, भूषण बाविस्कर या दोघांनी हा वाद पाहिला. दरम्यान, या प्रकारामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण असून, भविष्यात माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला नीलेश पाटील हे जबाबदार राहतील, असे डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. हवालदार विश्वनाथ गायकवाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.