प्रभाग समित्यांमधील बहुमतही भाजपने गमाविले : महापौर, उपमहापौर, गटनेत्यांसह आता सभापतिपदेही जाण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत भाजपचे ग्रह उलटे फिरले असून, बंडखोरांनी तीन महिन्यातच महापालिकेत भाजपला होत्याचे नव्हते केले आहे. तीन महिन्यांपूर्वी बहुमत असलेल्या भाजपकडून अवघ्या अडीच वर्षातच महापौर, उपमहापौरपद गेल्यानंतर भाजपला मनपा विरोधीपक्ष नेते पददेखील प्राप्त झालेले नाही. त्यात सभागृह नेते आणि आता गटनेतेपद गमाविल्यानंतर १२ जुलै रोजी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत बहुमत गमाविले असल्याने आता चारही प्रभाग समित्यांचे सभापतिपदही भाजप गमाविण्याच्या स्थितीत पोहोचले आहे.
मनपातील चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठीची निवडप्रक्रिया १२ जुलै रोजी पार पडणार आहे. यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले असून, या निवडप्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही प्रभाग समिती सभापतिपद भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र, ही चारही पदे भाजपच्या ताब्यातून जाऊन शिवसेना व बंडखोरांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. प्रभाग समित्यांमध्ये भाजपने तयारी केलेल्या प्रभागरचनेनुसारच भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावण्याची रणनीती शिवसेना व बंडखोरांनी आखली आहे. काही महिन्यांपूर्वी मनपातील सर्वच प्रभाग समित्यांमध्ये भाजपला बहुमत होते. मात्र, बंडखोरांमुळे भाजपचे कोणत्याही प्रभाग समितीमध्ये बहुमत नाही.
प्रभाग समिती ३ मध्ये एमआयएम निश्चित करणार सभापती
प्रभाग समिती एकमध्ये शिवसेना व बंडखोर मिळून एकूण २० पैकी १५ नगरसेवक आहेत, तर भाजपकडे केवळ चार जागा आहेत. प्रभाग समिती दोनमध्येदेखील भाजपकडे केवळ सात जागा असून, सेना व बंडखोरांकडे १३ जागा आहेत. प्रभाग समिती ३मध्ये भाजपकडे सर्वाधिक नऊ जागा असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १० जागा भाजपकडे नाहीत. याच प्रभाग समितीमध्ये सेना व बंडखोरांकडे सात जागा आहेत, तर एमआयएमकडे तीन जागा असून, या प्रभागात सभापतिपदासाठी आवश्यक बहुमतासाठी एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे एमआयएम कोणाच्या बाजूला जाते याकडे लक्ष लागले आहे तर प्रभाग समिती ४ मध्येदेखील शिवसेना व बंडखोरांची मिळून दहा जागा असून, याठिकाणीही भाजपचा सभापती होणे कठीण आहे.
केवळ स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे शिल्लक
मनपामध्ये भाजप बंडखोर व शिवसेनेने आखलेल्या चक्रव्यूहात भाजप पुरते फसत जात असून, महापौर, उपमहापौर पदासह गटनेतेपद, प्रभाग समिती सभापतिपद, विरोधी पक्षनेतेपद, सभागृह नेता, महिला व बालकल्याण सभापतिपद ही सर्व पदे बंडखोर व शिवसेनेच्या ताब्यात गेली आहेत तर भाजपकडे सद्य:स्थितीत केवळ स्थायी समिती सभापतिपद शिल्लक असून, येणाऱ्या दोन महिन्यात या पदासाठीदेखील निवडप्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भाजपची स्थिती अधिकच कमजोर होत आहे.
अशी करण्यात आली प्रभागसमिती रचना
प्रभाग समिती १- प्रभाग क्रमांक १, २, ५, ७, ८
प्रभाग समिती २- प्रभाग क्रमांक ३, ४, १५, १६, १७
प्रभाग समिती ३- प्रभाग क्रमांक ६, १३, १४, १८, १९
प्रभाग समिती ४- प्रभाग क्रमांक ९, १०, ११, १२
प्रभाग समितीनुसार पक्षीय बलाबल
प्रभाग समिती १ - बंडखोर १०, शिवसेना ५, भाजप ५
प्रभाग समिती २ - बंडखोर ९, शिवसेना ४, भाजप ७
प्रभाग समिती ३ - भाजप ९, शिवसेना ४, बंडखोर ३, एमआयएम ३
प्रभाग समिती ४ - भाजप ६, बंडखोर ८, शिवसेना २