जळगाव,दि.19- मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आरक्षण देत असताना सधन किंवा आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींना वगळावे.. पण जे आर्थिक दुर्बल आहेत.. त्यांना आरक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, असे म्हटले होते. त्यांचे आश्वासन कुठे गेले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात उपस्थित केला.
यावेळी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्करराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, बी.बी.पाटील आदी व्यासपीठावर होते.
जुमलो की सरकार
लोकसभेच्या कामकाजादरम्यान पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप असे अनेक मुद्दे भाषणात येतात. रोज नवीन नवीन ऐकायला मिळते. ही सरकार फक्त जुमलोकी सरकार असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली. डिजिटल कार्यक्रमासंबंधी विद्याथ्र्यानी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर त्या बोलत होत्या.
समान प्राथमिक शिक्षण धोरण हवे
माझी मुले मुंबईत चांगल्या विद्यालयात शिक्षण घेतात. पण जि.प.च्या शाळा, दुर्गम भागात असेच शिक्षण, सुविधा नाहीत. हीच बाब लक्षात घेता आरक्षणाचा नियम लागू आहे. परंतु शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाचे महत्त्व कमी करायचे असेल तर समान प्राथमिक शिक्षणाचे धोरण असावे. जि.प.च्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. नेत्यांचे दौरे असले की फक्त जि.प.च्या शाळांमध्ये रांगोळ्य़ा, सफाई होते. एरवीदेखील तसे चांगले चित्र या शाळांमध्ये हवे, असेही सुळे यांनी सांगितले. अनेक विद्यार्थी फक्त आरक्षणामुळे अधिक गुण असताना मागे पडतात. मेरिटच्या आधारावर शिक्षण व्यवस्था का नाही, असा मुद्दा एका विद्याथ्र्याने मांडला असता सुळे यांनी आपले मत मांडले.