रावेर, जि.जळगाव : मध्य प्रदेशातील नेपानगर मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या आमदार सुमित्रा कासदेकर यांनी भाजपात प्रवेश करून पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेले नेपानगर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सीमावर्ती भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांचीरावेर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक पार पडली.मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, लालबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.पी.सिंग, रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, लालबाग पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार तिवारी यांच्यात समन्वय बैठक झाली.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनी, मसल व लिकरच्या होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालून सीमावर्ती भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची माहिती आदान प्रदान केली. किंबहुना, ही विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याबाबत समन्वय ठेवण्याचा उहापोह झाला.
नेपानगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आंतरराज्य पोलीसांची समन्वय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 3:41 PM