आपण स्वत:ला अशाच कार्यात गुंतवून घेतले पाहिजे की, जेथे आपली प्रवृत्ती, चित्त आणि बुद्धी एक समन्वयाने कार्यरत असेल. असे कार्य कोणते? आपण आपल्या समोर वेळोवेळी ठेवलेले ध्येय आपले ध्येय आपणच ठरवायला हवे. इतर कुणी सांगतात म्हणून जे ध्येय ठरवले तर ते चुकीचे होईल. एक तर ते लादलेले होईल. ते साध्य करताना आपले चित्त बंडखोरी करायचा निश्चित प्रयत्न करेल.आपण आपले ध्येय ठरविले म्हणजे ते आपणाला हवे असते. ते साध्य झाल्यावर त्यापासून आपणाला समाधान मिळणार असते. आनंदाची प्राप्ती होणार असते. असे ध्येय साध्य झाले नाहीतरी साध्य करण्याच्या प्रयत्नात केले यातही आनंद मिळतो. याचा अर्थ नाही की आपण असाध्य किंवा कधीच पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेवावे.ध्येय असे ठेवा जे प्रयत्न साध्य आहे. असाध्य ध्येय ठेवल्याने शेवटी दमछाक होऊन, निराश होण्याची वेळ येऊ शकते. निराश होणे म्हणजे दु:ख प्राप्ती. दु:ख झाले म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश. तेव्हा प्रयत्न साध्य ध्येय असू द्या. त्या ध्येय प्राप्तीचा मार्ग ठरवा. त्या मार्गावर चालताना छोटे छोटे टप्पे ठरवा. असे टप्पे ठरविल्याने अंती आपला फायदाच होतो. एक टप्पा गाठल्याचे समाधान मिळते आणि त्याचवेळी पुढील टप्पा आपणास खुणावत राहील. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.याचवेळी हेही लक्षात ठेवा ध्येय ठरवताना ते अल्प प्रयत्नाने साध्य असेल असे ध्येय ठेवू नका. नाही तर होते असे की, असे ध्येय प्राप्त केल्यावर त्यापुढे ध्येय नसेल तर आपण तेवढ्याच ध्येय प्राप्तीच्या आनंदात वाहून जावू. आपले मन पुन्हा स्वैर होईल. स्वैर मनाच्या अपेक्षा पूर्ण करायला तुमच्या प्रवृत्ती कामाला लागतील आणि तुम्ही बुद्धीचा वापर थांबवाल. तुम्ही भरकटून जावून भान हरवून बसाल. याचा अर्थ असा आहे की, आपले ध्येय ठरवताना ते प्रयत्न साध्य असेलच पण त्यासाठी दीर्घावधी प्रयत्नांची गरज असेल.- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील
सुसंवाद आणि समन्वय आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 6:55 PM