जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंडे व अॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दल केलेले व्यक्तव्य तर दुसरीकडे त्यास गिरीश महाजन यांनी दिलेले आव्हान अशा नाराजी व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर रोजी जळगावात भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक होत आहे. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित राहणार आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीतही खडसे व महाजन गटाचा समतोल साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.या बैठकीस जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री उपस्थित राहणार आहेत.भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्यात बुथ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ७ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहतीमधील बालाणी रिसॉर्ट येथे ही बैठक होणार आहे.खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत रोहिणी खडसे यांच्यासह पंकजा मुंढे यांच्या पराभवास पक्षांतर्गत विरोधक कारणीभूत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांची नाराजी आहेच. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी खडसे यांना नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.
अंतर्गत नाराजी, काय होणार जळगावातील भाजपच्या आजच्या बैठकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:19 PM