लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्याचे ‘महानेट’चे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये हे नेट दिले जात होते. मात्र, आता ‘महानेट’द्वारे शासकीय शाळा, महाविद्यालये, मनपातील इतर विभाग व पोलीस स्टेशनसह जिल्हा रुग्णालय, न्यायालय या ठिकाणीही ही सेवा दिली जाणार असून, यासाठी शहरात केबल टाकून पोल लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मनपाकडे या कामाचा आराखडा सादर न केल्याने मनपाने हे काम थांबविले आहे.
जळगाव शहरात महानेटचे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. महानेटसाठीचे काम रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून केले जात असून, जीओच्या मोबाइल टॉवरवरून या केबल शासकीय कार्यालय, शाळांपर्यंत पोहोचविली जात आहे. यामुळे अनेक भागांत खोदकाम करण्यात येत असून, पोल लावताना संबंधित जागेचा घरमालकाची देखील परवानगी घेतली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महानेटअंतर्गत आतापर्यंत ४३५ खांब उभारले आहेत. हे खांब उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील विश्वासात घेतले गेलेले नाही. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले असून, जोपर्यंत रिलायन्स कंपनी मनपाकडे आराखडा सादर करणार नाही तोवर हे काम सुरू केले जाणार नाही, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.