जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : राज्य आणि राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना नोकरीत पाच टक्के आरक्षण दिल्याचे चांगले परिणाम सद्य:स्थितीत दिसून येत आहे. ग्रेस गुणांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा मैदानांकडे वाढला आहे. दरदिवशी किमान एक तास कसून सराव केल्यास फिटनेस चांगला असतो. बॉल फेकण्याचा सरावही चांगला होतो, असे मत यंदाच्या जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे मानकरी आणि आ.बं.मुलींचे विद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रवीण कनकसिंग राजपूत यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. 'लोकमत'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.प्रश्न : हॅण्डबॉल खेळात यशस्वी होण्यासाठी काय करणे अपेक्षित असते?राजपूत : खेळ कोणताही असो त्यासाठी नियमित सरावाची गरज असते. मुलांनी दररोज किमान एक तास तरी मैदानावर कसून सराव केला पाहिजे. यामुळे आपला फिटनेस चांगला राहतो. विशेष म्हणजे बॉल सरावही चांगला होतो. मी स्वत: मैदानावर मुलांना याचे आवर्जुन मार्गदर्शन करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांनी मोबाईलचा वापर टाळला पाहिजे.प्रश्न : आजवर तुमच्या खेळाडूंची मैदानावरची कामगिरी कशी झाली आहे?राजपूत : गेल्या २३ वर्षांपासून चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं.मुलींचे आणि मुलांच्या विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. राज्यस्तरावर आजपर्यंत एक हजारहून अधिक मुला-मुलींना पदक प्राप्त झाले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संघातही खेळाडूंनी नेतृत्व केले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये दीडशेहून अधिक खेळाडूंना पदकाने गौरविले आहे.प्रश्न : मुलांचा मैदानाकडे ओढा वाढविण्यासाठी काय करावे?राजपूत : खेळाडू विद्यार्थ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण दिल्याने त्याचे चांगले परिणाम गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. ग्रेस गुण देण्याचा निर्णयदेखील फायदेशीर ठरला आहे. हुशार मुलेही यामुळे मैदानाकडे येऊ लागली आहेत. याबरोबरच सध्या उपलब्ध असणाऱ्या क्रीडा सुविधांमध्ये वाढ झाल्यास अजून रिझल्ट चांगले येतील. क्रीडा साहित्य आणि पुरक साहित्यदेखील उपलब्ध असणे आवश्यक आहे.प्रश्न : खेळाडू विद्यार्थ्यांना काय सांगाल?राजपूत : मुलांना सांगण्याअगोदर पालकांना मी सुचवू इच्छितो की, आपल्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. मोबाईलचे साखळदंड अडकले की, मुले मैदानाकडे येतच नाही. ज्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे; त्यांनी टीव्ही आणि मोबाईल वर्ज्य करणे गरजेचे आहे.हॅण्डबॉल स्पर्धेतील कामगिरीसाठी मिळाला पुरस्कारप्रवीण राजपूत यांना हॅण्डबॉल स्पर्धेतील आजवरच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. प्रवीण राजपूत गेल्या २० वर्षांपासून राज्य हॅण्डबॉल स्पर्धेत पंच म्हणून सहभागी होत असतात. राष्ट्रीय स्तरावरही ते मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले आहेत. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम सहभागी होत असतात. चाळीसगाव शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षकाला असा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे.
क्रीडा सुविधा वाढल्यास मैदाने गजबजतील -प्रवीण राजपूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 4:03 PM
मुलांना मोबाईल प्रिय असला तरी त्यांचे पाय मैदानाकडे वळविण्यासाठी पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सातत्य आणि सराव हेच कोणत्याही खेळाच्या विजयाचे गमक असते. चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे. - प्रवीण कनकसिंग राजपूत
ठळक मुद्देचचेर्तील व्यक्तीची मुलाखतसंडे स्पेशल मुलाखत