जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील नियमित कुलसचिव पदासाठी २९ ऑगस्ट रोजी मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली असून यासंदर्भात गुरूवारी विद्यापीठ प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुलसचिव पदावर प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे नियमित कुलसचिव पदासाठी काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छुकांचे आठ ते नऊ अर्ज सुध्दा विद्यापीठाला प्राप्त झाले़ या उमेदवारांची २९ ऑगस्ट रोजी मुलाखत घेण्याचे नियोजन आखले गेले होते. मात्र, काही कारणास्तव ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठ कायद्यानुसार यामध्ये आता शासनाने हस्तक्षेप करून कुलसचिवांची नेमणूक करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. एकनाथ नेहते यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने हस्तक्षेप घ्यावा यासाठी अकरा अधिसभा सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले होते. दुसरीकडे मुलाखत पुढे ढकलण्यात आल्यामुळे विविध चर्चेंला उधाण आले आहे.