जळगाव (कुंदन पाटील): मुंबईतील कोटक महिंद्रा बॅंकेने कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क न भरता त्या रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील या बॅंकेच्या सर्वच शाखांमधील व्यवहारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. जळगावातील एकमेव शाखेची मंगळवारी तपासणी सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. अन्य बॅंकांमधील मुद्रांक शुल्क भरणाप्रक्रियेसंदर्भात सतर्क राहावे लागणार आहे. अन्य बॅंकांतील व्यवहारांचीही येत्या काळात चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील महिंद्रा कोट बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सुमारे अडिचशे प्रकरणात मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) शासनाच्या तिजोरीत न भरता स्वत:च्या खिशाला टाकून घेतली. त्यातून शासनाचा एक कोटी दोन लाखांचे नुकसान झाले आहे. मुंबईत पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुद्रांक आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी तातडीने ऑनलाईन बैठक घेतली आणि या बॅंकेच्या राज्यभरातील सर्वच व्यवहारांची चौकशी करुन मुद्रांक शुल्काची तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जळगावातील शाखेत मंगळवारी सहजिल्हा निबंधक के.पी.चौधरी तपासणी करणार आहे. एप्रिल २०२१ पासून या व्यवहारांची तपासणी होणार आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १० (ड) नुसार ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील घोटाळा उघड झाल्याने सर्वच बॅंकांमधील व्यवहारापोटी भरणा झालेल्या मुद्रांक शुल्क रकमेची पडताळणी करण्यात येणार आहे. तशा सूचना प्रत्येक कार्यालयाला दिल्या आहेत.बॅंकांनी सहकार्य करावे. - सुनिल पाटील, जिल्हा मुद्रांक अधिकारी.