लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या मालकीची आव्हाणे शिवारातील खासगी बाजार समिती व धरणगाव येथील नीलेश चौधरी यांच्या मालकीच्या खासगी बाजार समितीच्या जागांची सहकार विभागाच्या दोन पथकांनी गुरुवारी तपासणी केली. पणन संचालकांच्या आदेशाने ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी ‘लोकमत’ ला दिली.
पाळधी, ता.धरणगाव येथील प्रशांत नारायण झंवर यांनी १० एप्रिल रोजी पणन संचालक (पुणे) यांच्याकडे दोन स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. आव्हाणे शिवारातील लक्ष्मी कृषी उत्पन्न बाजार समिती २०१२ मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु करण्यात आली होती. या बाजार समितीत शेतकरी हित न पाहता फक्त व्यापारी दृष्टीकोनातून व्यवहार करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या बाजार समितीच्या मालकांची स्वत: जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. गेल्या दोन, तीन वर्षापासून या बाजार समितीत व्यवहार झालेला नाही. ही जागा रेल्वेच्या कंत्राटदारांला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले असून गैरसोय होत आहे. या जागेत रेल्वे कंत्राटदाराने सिमेंटचा मिक्सिंग प्लॅन, क्रशिन प्लॅन सुरु करुन उत्पादन घेतले जात असल्याचे झंवर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सहा जणांचे पथक
या तक्रारीची दखल घेत सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला आहे. त्यानुसार जिल्हा निबंधक संतोष बिडवई यांनी सहा जणांचे दोन पथके तयार केले. आव्हाणे येथील जागेची विशाल ठाकूर तर भोद येथील जागेची महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत ही चौकशी चालली. हा चौकशी अहवाल संचालकांकडे सादर केला जाईल, असे बिडवई यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"