ॲड. विजय पाटील यांचा आरोप : आयुक्त ठेकेदाराचे वकील म्हणून करताहेत काम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेवकांसह मनपा आयुक्तांचीही भागीदारी असल्याचा गंभीर आरोप ॲड. विजय पाटील यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेच्या मध्ये दुवा म्हणून लवाद नेमण्याचा घाट बीएचआरप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सुनील झंवर यांच्या सांगण्यावरूनच हाकला जात आहे. झंवर फरार असले तरी त्यांचे हस्तक महापालिकेत सक्रिय असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
रविवारी ॲड. विजय पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अतुल तडवी आदी उपस्थित होते. १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेच्या दरम्यान दुवा म्हणून काम करण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने महासभेत पुढे ठेवला आहे. मात्र, लवाद नेमून महापालिकेचा कोणताही फायदा होणार नसून यामुळे मनपाचे नुकसानच होणार असल्याने त्यांनी सांगितले. महासभेपुढे मनपा प्रशासनाने दिलेल्या ठरावाला मनपातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करण्याची गरज आहे. मात्र नगरसेवकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली, तर संबंधित नगरसेवकांनी विरोधात तक्रार केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात लोकमत प्रतिनिधीने मनपा आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.