कजगाव, ता. भडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांना चुकीचे औषध दिल्याने कजगाव येथे एकच खळबळ उडाली. यामुळे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली होती. काही काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
कजगाव येथील रहिवासी भीमराव सांडू महाजन यांच्या सुनबाई दीक्षा दीपक महाजन, नात लावण्या उमेश महाजन व नातू कार्तिक उमेश महाजन हे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ उपचारासाठी गेले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून संबंधितांना औषध लिहून दिल्या. मात्र, प्रत्यक्षात येथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषध न देता, दुसरेच औषध दिले. चुकीच्या दिलेल्या औषधामुळे संबंधित महिलांचे व दोन्ही बालकांची शारीरिक परिस्थिती बिघडल्याने एकच खळबळ उडाली.
शारीरिक परिस्थिती बिघडलेल्या दोन्ही बालकास व महिलेस गावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे हलविण्यात आले. या घटनेने गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. घडलेल्या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे
दरम्यान, गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या या दुर्दैवी घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, तर अनेकांनी या चुकीच्या औषधी देणाऱ्याचे नाव विचारले असता, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नाव न सांगितल्याने उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी उपस्थित सर्वच कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
आम्ही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो होतो. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी संबंधित कर्मचाऱ्यांनी न देता दुसरेच औषधी देण्यात आले. यामुळे माझी मुलगी, मुलगा व भावजई यांची शारीरिक परिस्थिती बिघडली. त्यामुळे आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
- उमेश भीमराव महाजन, पालक
घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी व चुकीचा आहे. त्यामुळे ही घटना अजिबातच पाठीशी घालण्यासारखी नाही. जो कोणी कर्मचारी याबाबतीत दोषी आढळेल, त्याला योग्य ती नोटीस देण्यात येऊन कारवाई करण्यात येईल.
- डॉ.प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी, कजगाव