चाळीसगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा आणि हरणबारी या चार धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा धरणाची पातळी गेल्या दोन दिवसात सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे. या पाण्याच्या विसर्गाने गिरणा धरणात शनिवारी सायंकाळी सहा पर्यंत एकूण ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यातील ही धरणे गिरणा धरणाच्या वरील भागात असून या धरणांमध्ये साठा चांगला झाल्यानंतरच या धरणातून पाणी सोडले जाते. यानुसार शुक्रवार पासून चणकापूर धरणातून ७६३० क्युसेस, पुनद धरणातून २४०१ क्युसेस, ठेंगोडा धरणातून ८९३९ क्युसेस तर हरणबारी धरणातून १२२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.या पाण्याच्या प्रवाहामुळे ३ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात ५ हजार ११७ दलघफू इतका म्हणजे ११.६६ टक्के पाणी साठा झाला होता.नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने आणखी एक- दोन दिवसात या धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील,शाखा अभियंता एस. आर.पाटील यांनी दिली.
गिरणा धरणात ११ टक्क्यांवर पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 8:27 PM