अमळनेर : कल्याण येथे गांजा सप्लाय करण्याप्रकरणी पारोळा येथील एका पुरुषासोबत महिलेला ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर येथून गांजा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले असून कल्याण पोलिसांनी अमळनेर येथून अशोक कंजर यास ताब्यात घेतले आहे.
कल्याण पश्चिम मध्ये महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत पावणे दोन किलो गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथील रोशन पांडुरंग पाटील यास 7 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गांजा पारोळा येथील सानेगुरुजी कॉलनीतील उषाबाई रमेश पाटील हिच्याकडून घेतल्याचे सांगितले.
कल्याण येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, पोलीस नाईक चौधरी, दिगर, बनगे आणि महिला पोलिस पवार या पथकासह चौकशीसाठी आले असताना त्यांना या महिलेने गांजा अमळनेर येथील अशोक कंजर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे गांजाचे अमळनेर व्हाया पारोळा कल्याण कनेक्शन उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी अशोक कंजर यांच्याकडून अमळनेर पोलिसांनी सुमारे १०० किलो गांजा पकडून अंमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
कल्याण प्रकरणातून अशोक कंजर याने पुन्हा आपला व्यवसाय सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.