लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्या पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे रूप पालटले होते. त्याच जोरात याठिकाणी अगदी पंधराच दिवसांत अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुष्यबळच नसल्याने जागा असूनही त्याचा वापर होत नाहीय व गंभीर रुग्णांनाही थेट परत जावे लागत आहे. यातून प्रशासकीय नियोजनाचा अभाव समोर आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ दिवसांमध्ये तीसपेक्षा अधिक डॉक्टर व अन्य कर्मचारी २० ते २२, अशा प्रकारे ५० पेक्षा अधिक जण बाधित आढळून आले आहेत. आधीच कोविड, नॉनकोविडची कसरत सुरू असताना व मनुष्यबाळ विभागले गेले असताना, अशा स्थितीत कोविडचे रुग्ण हाताळणार कसे? असा गंभीर प्रश्न यंत्रणेसमोर उभा आहे.
किमान तीन दिवस वेगळे राहावे लागेल
जे डॉक्टर सद्य:स्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस तरी सुटी द्यावीच लागणार आहे; अन्यथा व्हायरल लोडमुळे तेही बाधित होतील, आणि मग उपचार करणार कोण? असा गंभीर प्रश्न याठिकाणी निर्माण होणार आहे. आधी हे रोटेशन ७ दिवसांचे होते. मात्र, मनुष्यबळच नसल्याने ते घटवून ३ दिवसांचे करण्यात आले आहे. ही बाब डॉक्टरांच्या आरोग्यासाठीही घातक असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे तातडीने याठिकाणी मनुष्यबळाचे नियोजन होणे अत्यावश्यक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी काय?
गेल्या वर्षीही रुग्णांची फरपट झाली होती, सामान्य रुग्णांना कोणीच दाद देत नव्हते, काही रुग्णांचा यात मृत्यू झाला होता. त्यावेळी खासगी रुग्णालयांना रुग्णांना दाखल करून घेणे बंधनकारक केले होते. तक्रार निवारण्यासाठी वॉररूम उघडण्यात आली होती. वर्षभराच्या कालावधीने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.