जळगाव : पहिली ते आठवीप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकालही दूरध्वनी, एसएमएस तसेच आॅनलाईन पध्दतीने कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ मात्र, नववी आणि अकरावीचा निकाल लावण्यासाठी मुलांचे वर्षभराचे गुणांचे रेकॉर्ड पाहणे आवश्यक असून त्यासाठी शाळेत जावे लागणार आहे़ त्यामुळे पोलिसांकडून ये-जा करण्यासाठी विशेष पास उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, सोमनाथ पाटील, शितल जडे यांनी केली निवेदनाद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे़जळगाव जिल्हा हा ‘रेड’ झोनमध्ये आहे़ शिक्षकांना व मुख्याध्यापकांना शाळेत प्रवेश नाही. लॉकडाउनमुळे दहावीचे पेपर अद्याप तपासून झालेले नाही़ परिस्थितीत बिकट असताना नववी आणि अकरावीचे निकाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ मुलांचे वर्षभराचे गुणांचे रेकॉर्ड हे शाळेत आहेत. त्यामुळे शिक्षकांना, मुख्याध्यापकांना रिझल्ट तयार करण्यासाठी शाळेत जाणे गरजेचे आहे. तरच वर्षभराच्या मूल्यमापनाचे रेकॉर्ड शाळेतूनच उपलब्ध होतील़ तरच मुलांना पास-नापास कळवता येईल.म्हणून शिक्षक व मुख्याध्यापकांना पोलिसांकडून विशेष पास उपलब्ध करून द्यावेत. जेणे करुन सर्व शिक्षकांना येण्या-जाण्यासाठी त्रास व्हायला नको अन्यथा निकालाच्या बाबतीत सुधारित आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे़
पासेस द्या, अन्यथा सुधारित आदेश काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 12:44 PM