एसटी महामंडळ : लसीकरण होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एसटी महामंडळातील कोरोना बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन व इतर सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार महामंडळाच्या जळगाव विभागातही महामंडळाच्या अधिकाऱ्यांची 'समन्वय समिती' गठीत झाली आहे. माञ,अद्यापही या समितीकडून योग्य त्या पाठपुराव्या अभावी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा प्रश्न न सुटल्याने कर्मचारी व कामगार संघटनांमधून या समितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सरकारी आस्थापना व महामंडळामध्ये 'समन्वय समिती' गठीत करण्याचे सबंधित विभागांना आदेश दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागालाही पत्र पाठवून समन्वय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगाव विभागातही चार अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे कोरोना संक्रमित अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेडची व्यवस्था करून देणे, एखाद्या कर्मचाऱ्याला ऑक्सीजनची गरज भासल्यास ऑक्सीजन उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यकतेनुसार सरकारी किंवा खाजगी संस्थेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णालयात तब्येतीनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आदी जबाबदारी पार पार पाडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
इन्फो :
समन्वय समितीत या अधिकाऱ्यांचा समावेश
शासनाच्या सूचनेनुसार या समन्वय समितीत कामगार अधिकारी म्हणून राहुल शिरसाठ, पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून तुकाराम महाजन, सिद्धार्थ चंदनकर व भाऊसाहेब सपकाळे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना बाबत तक्रारी सोडविण्याचे आदेश दिले आहेत.
इन्फो :
लसीकरण होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
चालक- वाहक कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याबाबत विविध कामगार संघटनांतर्फे गेल्या महिन्या भरापासून महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याबाबत काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरणा बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेटही घेतली. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही. तसेच गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना कोरोना बाबत समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या समन्वय समितीतर्फेही लसीकरणा बाबत कुठलाही तोडगा न काढण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यां मधून तीव्र नाराजी उमटत आहे. तर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणा बाबत जिल्हाधिकाऱ्यांची दोनदा भेट घेतली असल्याचे कामगार अधिकारी राहुल शिरसाठ यांनी सांगितले.
इन्फो :
कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जळगाव विभागात स्थापन झालेल्या या 'समन्वय समिती' ची कामगारांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. बहुतांश कर्मचाऱ्यांना या समितीबाबत कुठलीही माहिती नाही. तसेच या समितीने कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचा प्रश्न सोडविला पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे, तसे होतांना दिसून येत नाही.
नरेंद्रसिंग राजपूत, सचिव, इंटक संघटना