लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एखादी महिला मनोरुग्ण असेल तर अशा स्थितीत विनाउपचार या महिलेला एका वसतिगृहात ठेवणे अयोग्य असल्याचे मत शहरातील काही मानसोपचार तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. आशादीप वसतिगृहातील तक्रार करणारी ती महिला मनोरुग्ण असल्याचा ठपका, प्रशासन व खुद्द महिलेच्या कुटुंबीयांनी ठेवल्यानंतर आता हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शहरातील काही मानसोपचार तज्ज्ञांशी याबाबतीत ‘लोकमत’ने संवाद साधला असता. अशा महिलेला मानसोपचार रुग्णालयातच ठेवणे योग्य आहे. शिवाय काही संस्थाही अशा महिलांना मदत करीत असतात. असे नसेल तरी किमान सातत्याने अशा महिलेची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे गरजेचे असते. असे तज्ज्ञांनी सांगितले. उपचाराशिवाय अशा महिलेला वसतिगृहात ठेवणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांचे उपचार परवडत नसले तरी शासकीय मनोरुग्णालये आहेत, किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात अशा रुग्णांना दाखल केले जाते. त्यामुळे तेथे त्यांना दाखल करावे, असेही मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. प्रदीप जोशी यांनी सांगितले आहे.