एरंडोल : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी दोन ते अडीच तासांपर्यंत ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट यांचे तांडवनृत्य सूरूच राहिले. उत्राण व जवखेडे बु. येथे वीज कोसळली. पुन्हा पुन्हा होणारी व कानठळ्या बसविणारी मेघगर्जना ही ढगफुटीला आमंत्रण देणारी ठरते की काय? असे वातावरण तयार झाले. मात्र, प्रत्यक्षात एरंडोल महसूल मंडळात ६० मिलिमीटर एवढ्याच जलधारा बरसल्या.
रिंगणगाव, कासोदा, उत्राण या तिन्ही महसूल मंडळांत पाऊस चाळिशीच्या आतच राहिला. यामुळे 'गरजते वो बरसते नहीं’ या उक्तीची प्रचिती नागरिकांना आली. गर्जनेप्रमाणे व्यापक स्वरूपात जर बरसला असता तर अंजनी धरण रात्रीतून १०० टक्के भरले असते. मंगळवारी धरण क्षेत्रावर ५७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. म्हणून धरणाच्या जलसाठ्यात ४ टक्क्याने वाढ झाली. धरण ५५.७२ टक्के भरले आहे. एकूण पाणीसाठा १२.४७ दलघमी इतका आहे.