चाळीसगाव (जि.जळगाव) : जशी विनोदाची कारणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे दु:खाकडे पहावे. तथापि, आपण दु:ख उगाळत राहतो आणि पुन्हा दु:खी होतो. प्रसन्नचित्त जगायचे असेल तर दु:ख गाळून घ्यायला शिका. इतरांना ‘तुमचं बरोबर आहे...’ असं म्हणा. हेच मन प्रसन्न करण्याचे सूत्र असल्याचे उद्बोधन डॉ.संजय उपाध्ये यांनी येथे केले.राजपूत लोकमंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना त्यांनी श्रोत्यांशी संवादही साधला. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे.व्यासपीठावर डॉ.सुनील राजपूत, मनीष शहा, संग्रामसिंह शिंदे, डॉ.संदीप देशमुख, हिंमत पटेल, नीलेश कांकरिया, ब्रिजेश पाटील, कांतीलाल पटेल उपस्थित होते.डॉ.उपाध्ये यांनी मनाच्या अप्रसन्नतेची कारणे सांगून त्यावर उपाय सांगताना श्रोत्यांना खळखळून हसविले. टीव्ही मालिकांनी भारतीय कुटूंब व्यवस्थेचा पायाच खिळखिळा केला.मालिकांमधील गोंधळ दुर्जन विचारांना चालना देणारा आहे. मनोरंजनात ज्ञान आणि प्रबोधन हे दोन्ही घटक आवश्यक आहे. मात्र याचा विसर पडला आहे.माणसे अप्रसन्न का होतात? याची कारणे सांगताना उपाध्ये म्हणाले, मनासारखी माणसं न मिळणं, नात्यांमधील जिव्हाळा संपणे, प्रतिष्ठा मिरवणे, घरात शिरताना वेगवेगळ्या प्रश्नांचं भेंडोळ घेऊन येणे. यामुळे संवाद हरविला. एकोपा नाहीसा झाला. इंग्रजी भाषेच्या अट्टाहासाने शिक्षणातील गोडवा संपला आहे. भाषा जरुर बदला, पण त्यातील आशय मातीशी जोडणारा असावा. सुरुवातीला ‘मन करा रे प्रसन्न’ आणि शेवटी ‘झालं गेलं विसरुन जा’ या कविताही त्यांनी सामूहिक म्हणून घेतल्या. सूत्रसंचालन विजय गर्गे यांनी केले.कसे रहाल प्रसन्न?आयुष्य प्रसन्न करायचे असेल तर त्याचे सूत्र आहे. ते समाजावून सांगताना उपाध्ये म्हणाले, मी जिवंत आहे ५० टक्के, आतून आनंदी असणे २५ टक्के, आहे ते स्वीकारणे २० टक्के. असे ९५ टक्के प्रसन्न असणे आपल्याच हाती आहे. उरलेले पाच टक्के नशिब म्हणून सोडून द्या. तुमचं बरोबर आहे. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा. तुम्ही शिकवा. ही समर्पणाची वृत्ती ठेवा. कर्म करा. मीच एकटा शहाणा हे टाळून वयोवृद्धांचे अनुभव बोल ऐकावे, अशी मन प्रसन्न करण्याची क्लृप्तीही डॉ.उपाध्ये यांनी उलगडून दाखवली.आज अहिरे यांचे व्याख्यानसोमवारी वाल्मीक अहिरे यांचे 'अहाणा, उखाणा, हासू फुटाण... घाट्यावरला गाना.. ना... ना.. तर्हाना' यावर व्याख्यान होणार आहे.
दु:ख उगाळण्याची नव्हे गाळून घेण्याची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:51 AM