१२ सीटीआर ४२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्यांना एक वेळचेही जेवण मिळणे शक्य नाही अशा अनाथ आजी-आजोबांसाठी नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानची फूड बँक आधारवड ठरली आहे. त्या आजी-आजोबांना एकवेळचे जेवण फूड बँकेच्या माध्यमातून देण्यात येत असून, त्यांची भूक शमविली जात आहे.
विवेकानंद शाळेचे शिक्षक धीरज जावळे, सुलतान पटेल, राकेश मुंडले, धनंजय सोनवणे, फारुक पटेल, रोशन मुंडले, नकुल सोनवणे, विजय पाटील, अविनाश जावळे या दहा युवकांनी नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड बँकेच्या माध्यमातून रस्त्यावरील अनाथ आजी-आजोबांना दररोज जेवण वाटपाची चळवळ २०१७ पासून सुरू केली आहे. सलग दोन वर्षांत एकही दिवस खंड पडू न देता या युवकांनी रस्त्यावरील निराधार व अनाथ आजी-आजोबांची भूक शमविण्याचे कार्य सतत सुरू ठेवले आहे. पाऊस असो की कडक ऊन हे युवक आपल्या जिद्दीच्या जोरावर दररोज न चुकता अनाथ आजी-आजोबांना वेळेवर जेवण पोहोचवित आहेत.
संध्याकाळी जमतात एकत्र...
हे सर्व युवक नोकरदार आहेत. दैनंदिन कामकाज आटोपून सर्व जण संध्याकाळी एकत्र येतात. त्यानंतर रस्त्यावरील निराधार आजी-आजोबांना अन्नदान करण्यासाठी निघतात. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युवकांच्या या चळवळीत शहरातील अनेक अन्नदाते जोडले गेले, तसेच अनेक पुरस्कारांनी फूड बँकेला सन्मानित करण्यात आले आहे.