लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ येत आहे तशी सोशल मीडियावरील राजकीय टोलेबाजी चांगली धम्माल उडविताना दिसत आहे. विशेषतः तरुणांकडून त्याद्वारे निष्क्रिय उमेदवारांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठविली जात असून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाच वर्षांच्या कालखंडानंतर यंदा होत असलेली ग्रामपंचायतीची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरत आहे. विशेष करून सोशल मीडियाच्या वापरामुळे निवडणुकीचा रंगच बदलून गेला आहे. पूर्वी थेट भेटीतून उमेदवार हे मतदारांशी संपर्क साधायचे. आता तशी परिस्थिती राहिली नसून मोबाइलवरील सोशल मीडिया उमेदवारांसाठी संवादाचे चांगले माध्यम बनले आहे. त्याकरिता अनेकांनी फेसबुक तसेच विविध व्हॉट्ॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातील मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यावर भरसुद्धा दिला आहे. मर्यादा असली तरी सोशल मीडिया त्यांच्याकरिता प्रचाराचे स्वस्त आणि मस्त साधन बनले आहे. अर्थात, मतदारांनीही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आतापर्यंत झालेला गावाचा कमी-अधिक विकास, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची क्रियाशीलता या बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पाच वर्षे काहीच काम न करणाऱ्या किंवा मतदारांशी कोणताच संपर्क न ठेवणाऱ्यांवर जाहीरपणे टीका करीत आपण कोठे कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
----------------
''''जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी तरी पॅरोलवर घरी भेटायला येतो. मात्र, आमच्या वॉर्डाचे मेंबर असे गायब झाले की जसे त्यांना तडीपार केले आहे पाच वर्षांसाठी...'''' यासह अनेक शाब्दिक माऱ्यांनी निष्क्रिय राजकारण्यांना वठणीवर आणण्याची शक्कल सोशल मीडियावर लढविली जात आहे. गावात त्याची चर्चा सध्या रंगली आहे.