चुडामण बोरसे ।जळगाव : आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांना आणखी सक्षम करण्यासाठी चोपडा तालुक्यातील आदिवासी बीटमधील शिक्षकांनी दिवाळीची सुटी न घेता विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले. चिरा चिरा हा घडवावा... अज्ञानी तो पढवावा... या गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या गीतातील वाक्य जणू या शिक्षकांनी सार्थ करुन दाखविले. या उपक्रमातून विद्याथी स्थलांतर रोखण्याचा एक प्रयत्न या शिक्षकांनी केला.शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांच्या संकल्पनेतून दिवाळीची सुटी न घेता त्याचा सदुपयोग विद्यार्थ्यांसाठी करावा, असा विचार पुढे आला आणि बीटमधील सर्व शिक्षकांनी या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. शाळांनी सुटीच्या या कालावधीतील वर्गांचे नियोजन केले. कोणावरही यासंदर्भात सक्ती नव्हती. प्रत्येक शिक्षकांनी नियोजनानुसार आपले योगदान दिले. या उपक्रमाला गटविकास अधिकारी भरत कोसोदे, ,गट शिक्षणाधिकारी भावना भोसले यांनी चालना दिली. या अध्ययनस्तर विकसन कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या वर्गातील प्रारंभिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना अंक व अक्षर ओळख करून सराव करून घेण्यात आला.शिवाय दिवाळीच्या सुटीत पोषण आहारही शिजविला जात होता. जि.प.शाळा खा-यापाडाव ही शाळा आदिवासी बीटमधील नागलवाडी केंद्रातील दुर्गम भागातील शाळा. तिथे तीन शिक्षक कार्यरत आहेत. कचवे ,सुकलाल बारेला व पावरा हे तीन शिक्षक. बीट मधील शाळांची दिवाळीच्या सुटीत केलेल्या शैक्षणिक कामामुळे यांनी चक्क प्रेरित होऊन रविवारी ही गुणवत्ता विकासाचे काम सुरु ठेवले, हे विशेष. यासाठी विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील, वराडचे विवेक वसंत पाटील , बोरअजंटीचे गुरूदत्त गोविंद निंबाळे, वैजापूरचे हरिराम मगन भादले, खाऱ्यापाड्याचे विजयकुमार रोहिदास कचवे, शेनपानीचे पंकज विजय बडगुजर, कर्जाणीचे लिलाधर सिताराम बाविस्कर, जिरायतपाडा येथील बिलदार दणका पावरा, देवझिरीचे श्रावण वामन जाधव, देवगडचे अरूण नारायण पाटील, विष्णापूरचे मणीलाल बाबूलाल पाटील, चांदण्यातलावचे पप्पू तडवी, मोरचिडाचे प्रमोद पाटील, लासूर केंद्राचे उत्तम चव्हाण, नागलवाडीचे वंदना बाविस्कर, धानोरा येथील अंबादास पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.चोपडाचोपडा तालुक्यातील १) वराड, २) नागलवाडी, ३) वैजापूर, ४) खा-यापाडा, ५) शेनपानी, ६) कजार्णे, ७) जिरायत पाडा, ८) विष्णापूर, ९) चांदण्यातलाव, १०) देवझरी आणि ११) देवगड या आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
चिरा चिरा हा घडवावा... अज्ञानी तो पढवावा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:55 AM