लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असलेल्या यावल अभयारण्यातील मंडप नाला भागात रविवारी काही शस्त्रधारी शिकाऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळीबार केल्याच्या घटनेत कटनी टोळीच्या शिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मध्यप्रदेशातील ‘कटनी टोळी’ यावल अभयारण्यात सक्रिय झाली असून, आता या शिकाऱ्यांच्या नजरा यावल अभयारण्यातील वन्यजीवांवर आल्या आहेत. यावल अभयारण्यातील लंगडा आंबा, मंडप नाला, जळगाव वनक्षेत्रातील वढोदा, चारठाणा भागात वाघांचे अस्तित्व अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यात दोन वाघांचा मृत्यू गेल्या वर्षात विविध कारणांनी झाला होता. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व असले तरी वाघांच्या रक्षणासाठी व वाघ वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न वनविभाग किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून केले जाताना दिसून येत नाहीत. जिल्ह्यातील काही पर्यावरण संस्था जिल्ह्यातील वाघांच्या संरक्षणासाठी झगडत आहेत. मात्र, त्या वाघांवर आता मध्यप्रदेशातील शिकाऱ्यांचीही नजर पडली आहे.
मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातील ही टोळी असल्याचा संशय
आतापर्यंत काही वर्षांपासून अनेक शिकाऱ्यांची वर्दळ यावल अभयारण्यासह सातपुडा भागात वाढली आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या व शिकारीच्या शोधात अनेक वन्यजीव हे जंगलात भ्रमंती करत असतात. यामुळेच या काळात शिकारी टोळ्यादेखील अधिक सक्रिय होतात. कटनी ही टोळी मध्यप्रदेश भागातील कटनी या जिल्ह्यातून आलेल्या शिकाऱ्यांची असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. ही टोळी प्रामुख्याने मेळघाट या भागातच शिकार करत होती. मात्र त्या भागात वनविभागाकडून लक्ष घालण्यात येत असल्याने आता या टोळीने आपली नजर यावल अभयारण्यातील वन्यजीवांकडे वळविली आहे. दरम्यान, यावल अभयारण्यात आतापर्यंत कुठल्याही प्राण्याची शिकार झाली नसल्याची नोंद वनविभागाकडे अद्यापपर्यंत नाही. त्यामुळे कदाचित मध्यप्रदेशातील सागाची तस्करी करणारी ही टोळी असल्याचा संशय अनेकांकडून वर्तविण्यात येत आहे.
वाघ व अस्वलांच्या शिकारीवर भर
रविवारच्या घटनेत सहभागी असलेले शिकारी हे कटनी टोळीचेच असण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक आदिवासींचा सहभाग शिकारींमध्ये राहत नाही. स्थानिक आदिवासी जंगलातील अतिक्रमणावरच अधिक भर देतात. कटनी टोळीच्या सदस्यांकडे नेहमी बंदुका असतात. तसेच जंगलामध्ये स्टील ट्रॅक लावून वाघ व अस्वलाची शिकार करतात. स्टील ट्रॅकमध्ये वाघ अडकल्यानंतर बंदुकीद्वारे वाघाची हत्या करत असतात. लंगडा आंबा, मंडप नाला भागात अस्वलाचींही संख्या जास्त आहे. त्यातच वाघाचेही अस्तित्व असल्याने शिकारी टोळ्या यावल अभयारण्यात सक्रिय झाल्या आहेत. कटनी टोळी ही वाघांच्या शिकारीसाठी प्रसिध्द आहे. वाघांची शिकार करून काही व्यापाऱ्यांना वाघांची कातडी दिली जाते. त्यानंतर हॉगकॉँग, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये वाघाची कातडी पाठविली जाते. वाघ व अस्वलाची शिकार करणारे हे मोठे रॅकेट असून, यामागे अनेक बड्या हस्तींचाही समावेश आहे. दरम्यान, स्थानिकांकडूनदेखील या टोळींना मदत केली जाते.
कोट..
आतापर्यंत हे शिकारी कोठून आले होते, याबाबतचा पाठपुरावा पोलीस व वनविभागाच्या पथकाकडून केला जात आहे. ही टोळी वाघाच्या शिकाराच्या उद्दिष्टाने या भागात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र वनविभाग लवकरात लवकर याबाबत तपास करून, मुख्य माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.
- अक्षय म्हात्रे, प्रादेशिक वन अधिकारी, यावल