लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टागोर नगरातील मोकळ्या जागेतील शौचालयाच्या जीर्ण ११ फूट खोल असलेल्या टाकीत किशोर बळीराम पाटील (वय ४०, रा. टागोरनगर) या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी ८ वाजता आढळून आला. त्याला बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला तब्बल ९ तास लागले. यासाठी जेसीबी, मनपाचे पथक तसेच तांबापुरातील तरुण अशी यंत्रणा राबली.
टागोर नगरात मोकळ्या जागेत असलेल्या शौचालयाच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याने रहिवासी राजेंद्र पाटील यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यात किशोर पाटील असल्याचे लक्षात आले. लोकांनी ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पुरुषोत्तम वागळे, अशोक सनकत यांनी घटनास्थळ गाठले. टाकी लहान असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे काही भाग फोडण्यात आला. दोरी व खाट मागविण्यात आली, परंतु घातपाताचा प्रकार आहे की काय म्हणून मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर निघावा यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र तरीही मृतदेह बाहेर काढायला अडचणीच येत होत्या. जेसीबी आणून टाकी खोदण्यात आली. त्यानंतर तांबापुरातील रवी हटकर, विजय शिंदे, अवी नन्नवरे, वसीम खाटीक, सागर गोसावी, राहुल गारुडी, ठाणाजी गवळी आदी तरुणांनी टाकीत उतरुन प्रयत्न केले. तेव्हा सायंकाळी ५ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घर जमीनदोस्त; टाकी कायम
ज्या टाकीत मृतदेह आढळला. तेथे पूर्वी घर होते. हे घर जमीनदोस्त करण्यात आले, मात्र टाकी कायम होती. भल्या मोठ्या मोकळ्या जागेत अगदी कोपऱ्यात ही टाकी आहे. त्यामुळे हा काही घातपाताचा प्रकार आहे का? अशीही चर्चा या ठिकाणी होती. दरम्यान, तो सतत मद्याच्या नशेत असायचा. रात्रीच्यावेळी लघू शंकेसाठी गेल्यावर तो टाकीत पडला असावा, असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे, मात्र तो कधीच तिकडे जात नव्हता, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू
सहा महिन्यापूर्वी आई बेबीबाई उर्फ अलका यांचे निधन झाले आहे. किशोर हा एकटाच होता. खोली भाड्याने देऊन त्यावर येणाऱ्या पैशांमधून त्याचा उदरनिर्वाह सुरू होता. किशोरच्या पश्चात बहीण कीर्ती व मावशी नलिनी असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे. तपास पुरुषोत्तम वागळे करीत आहेत.
कोट...
नाकातोंडात पाणी गेले, त्यात गुदमरून तरुणाचा मृत्यू झाला आहे. शरीरावर मारहाणीचा खुणा नाहीत. घातपात झाल्यासारखे किंवा संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही.
-डॉ.सचिन अहिरे, शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी