लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड महामारीमुळे सर्व ग.स. सोसायटीच्या सर्व सभासदांवर आर्थिक ताण आला असून त्यानुसार २ टक्क्यांनी व्याजदर कमी करावा, या लोकमान्य पॅनलच्या मागणीवर पुढील महिन्यापासून विशेष कर्जावरील व्याजदर कमी करण्याचे आश्वासन संस्थेचे प्राधिकृत मंडळाने दिले. ग.स.सोसायटीची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने रविवारी पार पडली. दरम्यान, यात अनेक सभासदांना सभेचा आयडीच न मिळाल्याने त्यांना सभेत सहभागी होता न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी, सदस्य प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले, संस्थेचे व्यवस्थापक एस.आर.पाटील आदींसह ८ सभासदांचा ऑनलाईन या सभेत सहभाग होता. यात लोकमान्य गटाकडून मांडण्यात आलेल्या मुद्यांबाबत सदस्य अमित पाटील यांनी माहिती दिली. तसेच संस्थेला १३.०५ कोटींचा विक्रमी नफा झाल्याने संस्थेचे अभिनंदन करण्यात आले. मयत सभासद मुक्ती फंड करिता १०० टक्के कर्ज माफ होण्यासाठी नवीन सुधारित तरतुदीला अभ्यास समिती स्थापन करणे, कर्मचाऱ्यांचा बोनस, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, पदोन्नती, कालबद्ध वरिष्ठ वेतनश्रेणी, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभासदांचा आरोप
ग. स. सभासदांना ऑनलाईन सभेसाठी आयडी कळविण्यात आले नाही. त्यामुळे सभासदांना सभेत सहभागी होता आले नाही. ज्या सभासदांच्या जीवावर सोसायटी उभी आहे, त्यांचीच अशा प्रकारे प्रतारणा करणे योग्य नसल्याचे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी म्हटले आहे.