रामदेववाडीचा तरुण : शेत मशागत करताना घडली दुर्घटना
जळगाव : ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करताना ट्रॅक्टर पलटी होऊन कैलास तुकाराम राठोड (वय २०) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता तालुक्यातील रामदेववाडी शिवारात घडली. कैलास हा आयटीआयचा विद्यार्थी होता.
दरम्यान, डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने आई, वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास तुकाराम राठोड हा आयटीआयमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी बुधवारी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात आई मुन्नाबाई, वडील तुकाराम गंगाराम राठोड आणि मोठे काका सीताराम गंगाराम राठोड यांच्यासह ट्रॅक्टरने गेला होता. प्रत्येक जण शेतात आपापले काम करीत होते. कैलास हा शेतात ट्रॅक्टरने टिलर करण्याचे काम करत होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बांधावरुन ट्रॅक्टर वळवित असतांना ट्रॅक्टर अचानक पलटी झाले. त्यात कैलासच्या पोटावर चाक आल्याने त्याचा दबून मृत्यू झाला. यावेळी शेतात काम करणारे आई, वडील व काका यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत कैलास ठार झाला होता. डोळ्यासमोर मुलाचा दबून मृत्यू झाल्याचे पाहून आई - वडिलांनी एकच हंबरडा फोडला. शेजारील शेतकऱ्यांनी तातडीने ट्रक्टर बाजूला करून कैलास याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता तेथे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे तपास करीत आहेत.