लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एक किंवा दोन कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. पण, जळगाव शहरातील शासकीय मुलींचे आयटीआयचे प्राचार्य ए.आर.राजपूत यांच्याकडे तब्बल सात संस्थांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे नियमित भार त्यात अतिरिक्त पदभार अशी अवघडलेली अवस्था झाली आहे.
प्राचार्य राजपूत यांची नियमित नेमणूक मुलींची शासकीय आयटीआयमध्ये असून त्यांच्याकडे वरणगाव, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ येथील टेक्नीकल महाविद्यालयाचा तर उचंदा, जोंधनखेडा, भुसावळ आयटीआय महाविद्यालयांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. दरम्यान, वरणगाव व जळगाव तांत्रिक महाविद्यालयांचा पदभार हा दुस-या अधिका-यांना देण्याबाबत आदेश पारित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद असल्यामुळे लवकरचं संबंधित अधिका-यांना तो पदभार सोपविण्यात येणार आहे.
१८ प्राचार्यांची पदे रिक्त
कौशल्य विकास व उद्योजकता विभागातंर्गत येणा-या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित जळगाव जिल्ह्यात २१ शासकीय आयटीआय व तांत्रिक महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यामध्ये १६ शासकीय आयटीआय व ५ तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, या २१ महाविद्यालयांमध्ये तब्बल १८ वरिष्ठ व कनिष्ठ प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने गेल्या काही वर्षांपासून रिक्त पद न भरल्यामुळे सध्या आयटीआय व तांत्रिक महाविद्यालयांमध्ये सुध्दा प्रभारी राज सुरू आहे. काहींकडे तर अतिरिक्त कारभार सुध्दा देण्यात आला आहे.
दोन प्रशासकीय अधिकारी पदे रिक्तदरम्यान, शासकीय आयटीआय व तांत्रिक महाविद्यालयांमध्ये दोन प्रशासकीय अधिकारी पदे सुध्दा रिक्त आहेत. दुसरीकडे तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नसल्यामुळे प्रभारी कारभार सुरू आहे. दोन्ही संस्थांमध्ये रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर या जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
अशा आहेत रिक्त जागा
वर्ग - १ : वरिष्ठ प्राचार्यांची ०२ पदे
वर्ग - १ : कनिष्ठ प्राचार्यांची ०८ पदे
वर्ग - २ : प्राचार्यांची ०८ पदे
प्रशासकीय अधिकारी : ०२ पदे