जळगाव : 'याची युती होती, त्याची युती होती, असं करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे' अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी बोदवडमध्ये शिवसेना आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. जामनेरात गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?बोदवडच्या निवडणुकीत आम्ही कोणाशीही युती केलेली नव्हती. फक्त प्रचारादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी माझी भेट झाली, आम्ही चहा घेतला म्हणजे युती होती, असं होत नाही. याची युती होती, त्याची युती होती, असं करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे, असा टोला गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला.
'खडसेंनी रडीचा डाव खेळू नये'खडसेंवर निशाणा साधताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, तुम्ही विधानसभा हरलात. कोथळीत 4 ग्रामपंचायत सदस्यही तुमचे नाहीत. मुक्ताईनगरमध्ये तुमचा नगराध्यक्ष नाही आहे. आता तर बोदवड पण तुमच्या हातून गेले. तुम्ही भाजपची काळजी करू नका. तुमचंच बघा ना, रडीचा डाव खेळू नका. तुम्ही तुमची राष्ट्रवादी जिवंत ठेवा, भाजपची काळजी करू नका, असा चिमटाही गिरीश महाजन यांनी काढला.