जळगाव : सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल असे एक प्रकरण सध्या पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात आले आहे. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी सुरू असलेले प्रेमप्रकरण पतीला समजले. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रियकराला सोडून मुकाट्याने संसार करण्याचा सल्ला पतीने दिल्यावर पत्नीने तो मान्य न करता तुम्ही पण कुणाशी तरी सूत जुळवा. मी प्रियकरासोबत तर तुम्ही पण तुमच्या प्रेयसीसोबत संबंध ठेवा. मात्र, तिच्याशी लग्न करू नका, असा अफलातून सल्ला पत्नीने पतीला दिला. या प्रकरणावर अजून तरी तोडगा निघालेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत कधी एकही प्रकरण आलेले नाही, असे जिल्ह्यातील एक पती-पत्नीतील वादाचे प्रकरण महिला साहाय्य कक्षाकडे आले आहे. यातील दाम्पत्याला दोन मुले आहेत. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना पत्नीचा प्रियकर या संसारात आडवा आला. पत्नीचे बाहेर कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याची जाणीव पतीला झाली. त्याने पाळत ठेवून पत्नीचा भंडाफोड केला. पत्नीने प्रेमप्रकरण मान्य करून पतीशी वाद घातला. दोन्ही कुटुंबांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. प्रकरण पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाकडे आले. तेथे दोघांना बोलावण्यात आले. दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर संसार पूर्वपदावर यावा म्हणून महिला पोलिसांनी दोघांची समजूत घातली.
...अन् महिला पोलीस अवाक् झाल्या
तडजोडीचा प्रयत्न करीत असतानाच प्रियकराला मी सोडू शकत नाही, माझे जसे बाहेर आहे तसे तुम्ही पण करा. एखाद्या मैत्रिणीशी सूत जुळवा, असा अफलातून सल्ला पतीला दिला. प्रकरण हाताबाहेरच जात असल्याच्या संतापात पतीने थेट दुसरा विवाह केला. इकडे पत्नीने प्रियकराशी विवाह केला, दोन्ही मुलांना सोबत घेतले. यानंतरही पुढच्या तारखेला काही दिवसांनी परत प्रकरण महिला कक्षात आले. तेव्हा देखील पत्नीने पतीने जिच्याशी विवाह केला आहे तिला सोडावे, मी पतीसोबत संसार करायला तयार आहे; परंतु प्रियकरासोबत कायम राहील तसे तुम्ही जिच्याशी विवाह केला तिच्याशी प्रेमप्रकरण सुरू ठेवा, असा पुन्हा सल्ला दिला. पत्नीच्या अफलातून सल्ल्याने महिला पोलीसदेखील अवाक् झाल्या. या विचित्र कथेचा अद्याप शेवट झालेला नाही. त्यांना पुढे तारीख देण्यात आली आहे.
कोट...
प्रकरण संवेदनशील आहे. दोघांचा संसार पुन्हा कसा बहरेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या दाम्पत्याची मुले महिलेकडे आहेत. प्रियकराला सोडत असेल तर पती पत्नीला नांदवण्यास तयार आहे. पत्नीच्या विचित्र मागण्या व हट्ट यामुळे या प्रकरणात तोडगा निघालेला नाही. मुलांच्या भवितव्याचा विचार करता दोघे परत एकत्र येतील, अशी आशा आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
-सविता परदेशी, समुपदेशक, महिला साहाय्य कक्ष