लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मद्य प्राशनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून सागर महारु सपकाळे (३१, रा.प्रजापत नगर,जळगाव) याने शनी पेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःच्या हातावर धारदार पट्टीने वार करून स्वतःला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सागर सपकाळे याच्याविरुद्ध बुधवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सपकाळे हा नेहमीच पोलीस स्टेशन मधील कर्मचारी तसेच रस्त्यावरील लोकांकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत असतो, पैसे दिले नाही तर स्वतःलाच जखमी करुन पोलिसांना फसविण्याचा व त्यांची नोकरी घालण्याची धमकी देत असतो. बुधवारी दुपारी त्याने असाच प्रकार केला. पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन ड्युटीवर असलेल्या योगेश माळी व इतर अमलदारांकडे पैशाची मागणी केली. मला पैसे द्या नाही तर मी माझ्या हातापायास पट्टी मारून घेईल, न्यायालयात आणि वरिष्ठांना तुमचे नाव सांगेल अशी धमकी दिली.
फरशीवर शिंपडले रक्त
दरम्यान, काही पोलीस अंमलदार त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने स्वतःच्या हाताने उजव्या हाताच्या पंजावर धारदार पट्टीने वार केला तसेच त्याचे रक्त पोलीस ठाण्यातील फरशीवर शिंपडले. ''तुम्ही मला नेहमी पैसे द्या, नाही तर मी माझ्या मानेवर पट्टी मारेल व जीव देईन, माझी बायको व मुलांना सांगेल की, मला पोलिसांनी मारले आहे व तुम्ही न्यायालयात असच सांगायचे'' अशी धमकी भरली. दरम्यान, हा नेहमीचा त्रास असल्याने ड्युटीवरील पोलिसांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या कानावर टाकला. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन सागर सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अंमलदार योगेश माळी यांच्या फिर्यादीवरुन सागर सपकाळे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परिष जाधव करीत आहे.