जळगाव, दि.5- जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव व पोलीस शिपाई आमले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी 8 वाजता दोन हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली.
जळगाव कारागृहातील कैद्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. संबधित कैद्याच्या नातेवाईकांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दोघांविरूद्ध सापळा लावण्यात आला. लाचेच्या मागणीनुसार नातेवाईक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक डाबेराव यांच्याकडे पोहचले होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास दोन हजार रुपये घेतांना पथकाने दोघांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.