जळगाव : सिटी मालेगाव क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या खुल्या टी-२० राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत जैन इरिगेशन संघाने अंतिम सामन्यात सीएमसीए मालेगाव संघाचा ८९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात फलंदाजीत ३० धावा आणि गोलंदाजीत १९ धावांत ३ गडी बाद करणारा तनिष जैन हा सामनावीर ठरला. तसेच त्याने मालिकाविराचा किताबदेखील पटकावला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जैन इरिगेशनने २० षटकांत ७ गडी बाद १९८ धावा केल्या. त्यात सिद्धेश देशमुखच्या सर्वाधिक ५४ धावा केल्या. सोबतचच वरुण देशपांडे (३२), तनिष जैन (३० धावा)सौरभ सिंग (२५), रिषभ करवा (१८) यांनी शानदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात सीएमसीए मालेगाव हा संघ १५.२ षटकात फक्त १०९ धावात बाद झाला. त्यांच्यातर्फे इरफान अन्सारीने सर्वाधिक ३९ धावा व खलिद जमान ३७ धावा केल्या.
जैन इरिगेशनतर्फे तनिष जैन व राहुल निंभोरे यांनी प्रत्येकी १९ धावा देत तीन गडी बाद केले. रिषभ करवाने २ अमित गवांदेने १ बळी घेतला, तसेच एक फलंदाज धावबाद झाला.