जळगाव : शहरात भरदिवसा व तेही वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूलचा धाक दाखवून महेशचंद्र मोहन भावसार (५३, रा.दिक्षितवाडी) व संजय सुधाकर विभांडीक (५१, रा.महाबळ) यांच्याजवळील १५ लाखाची रोकड लुटल्याची थरारक घटना सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली. चोरट्यांकडून फायर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पिस्तूलमधील मॅग्झीन जमिनीवर पडल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान, लूट करणारे दोघं जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते धुळ्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मनोज खुशाल मोकळ व विक्की उर्फ रितीक राणा असे दोघांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत. ट्रॅव्हल्स बसने ते अमळनेर व तेथून दुसरीकडे पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली. महेश भावसार व संजय विभांडीक हे उद्योजक विशाल लुंकड यांच्या प्रभा पॉलीमर या कंपनीत कामाला असून त्यांचे आर्थिक व्यवहारही सांभाळतात. लुंकड यांनी हवाल्यामार्फत सोमवारी १५ लाख रुपये पाठविले होते. रथ चौकातून ही रक्कम घेऊन भावसार व विभांडीक स्वतंत्र दुचाकीने गणपती नगरात जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मागून विना क्रमांकाच्या नव्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूलने फायर करण्याचा प्रयत्न करुन बॅग पळविली. झटापट झाल्याने चोरटे जागेवरच त्यांची दुचाकी सोडून पळाले. या घटनेत रोकड गेली, पण दोघांचा जीव वाचला. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेत पथके रवाना केली.
जळगावात भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून १५ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:56 PM