जळगाव : दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात समृध्दी अपार्टमेंट या सात मजली इमारतीवरुन उडी घेऊन कृष्णा सुधीर अहिरे (वय १८,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. सकाळी घरी येऊन कृष्णा याला चार जणांनी धमकी दिली होती, त्यांनीच त्याला मारल्याचा आरोप कृष्णाच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, आरोपासह सर्व संशय, शक्यतांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा याला स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी दुचाकी चोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. दुसऱ्याने चोरलेल्या दुचाकी कृष्णाने विक्री केल्या होत्या. या चारही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यामुळे ज्यांनी या दुचाकी घेतल्या होत्या त्यांनी कृष्णाकडे पैशाचा तगादा लावला होता. याच प्रकरणातून रविवारी चार जण घरी आले होते. आमचे पैसे परत कर असे सांगून धमकावत होते. पैसे कसे काढायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे असे हे चारही जण सांगत होते, अशी माहिती कृष्णाचे वडील व भावाने दिली. हे चार जण गेल्यानंतर तासाभराने कृष्णा घरातून गेला होता. दरम्यान, दुचाकी प्रकरणात काही पोलिसांनी मुलाचा खूप छळ केला असाही आरोप सुधीर अहिरे यांनी केला. दुचाकी चोरीचा जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
या इमारतीत आलाच कसा?राजमालती नगरातएकही मित्र किंवा नातेवाईक नाहीत, त्यामुळे तो या भागात आलाच कसा? असा प्रश्न त्याच्या वडिलांनी उपस्थित करुन त्याला तेथे नेण्यात आले व इमारतीवरुन ढकलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुलाचा मृतदेह पाहून आईची शुद्धच हरपली होती. कृष्णाचे वडिल, भाऊ व आई तिघांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक केल्याशिवाय पोलिसांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कुटूंब पोलीस वाहनाच्या समोर आडवे झाले होते. जळगाव शहर व जिल्हा पेठ पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत घातली.
तरुणीशी प्रेमसंबंधकृष्णा याचे वाघ नगर परिसरातील एका तरुणीशी प्रेमप्रकरण सुरु होते, मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसले होते. त्यामुळे कृष्णा तणावात होता. तरुणीच्या मामाने देखील फोन करुन कृष्णाला धमकावले होते, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला. दरम्यान, प्रेमप्रकरण, दुचाकी चोरी व विक्रीचे प्रकरण, वडिलांनी केलेले आरोप या सर्व मुद्यांवर तपास केला जात असून मोबाईल लॉक असल्याने काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून बरेच काही समोर येईल, मात्र सर्व शक्यतांवर तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी ‘लोकमत’ सांगितले.