- सुनील पाटील
जळगाव - खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहूल पवार (वय ६, रा.हरिविठ्ठल नगर, मुळ रा. कुसुंबा ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलीस व अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.
या संदर्भात माहिती अशी की, शनिवारी दुपारी चार वाजता सचिन त्याची १० वर्षाची बहीण आणि परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन नाल्यात उतरला. मात्र त्याच वेळी पाऊस आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा केली असता नागरिकांनी धाव घेतली. कुटूंबिय देखील धावत आले.
नाल्यात उतरुन शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. सायंकाळी अग्निशमन विभागाचे पथकही त्याठिकाणी दाखल झाले. पण कुठेही थांगपत्ता लागला नाही.रात्री उशिरापर्यंत पोलीस व अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध सुरु होता. सचिनचे वडिल राहुल किसन पवार (वय ३२) हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, सचिन, व मुलगी असा परिवार आहे. कुटूंबियाचा आक्रोश पाहून अनेकांना गहिवरुन आले होते.