जळगाव - शहरातील नवीन बसस्थानकातील वर्कशॉप भागामध्ये उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास घडली. वेळीच पाण्याचा मारा करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
एसटी महामंडळाची एक कार (एमएच.०६.एएस.६३४६) रात्री ८ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून एका अधिका-याला घेवून नवीन बसस्थानक येथे आली. त्यानंतर ही कार बसस्थानकातील वर्कशॉप भागात एका ठिकाणी पार्क करण्यात आली होती. दरम्यान, रात्री १०.२० वाजेच्या सुमारास अचानक बॅटरीच्या वायरमध्ये स्पार्कींग होवून कारने पेट घेतला. कारला आग लागल्याचे कळताच, कर्मचा-यांनी अग्निशमन बंब बोलवून घेतले. त्यानंतर बंबाद्वारे आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र, या आगीत कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.