मनोज जोशीजळगाव : तीन शेतकऱ्यांकडील सहा लाखांचा ७७ क्विंटल कापूस घेऊन ट्रकचालक पसार झाला. ही घटना लोंढ्री, तांडा, ता.जामनेर येथे घडली. यामुळे या शेतकऱ्यांना मोठाच आर्थिक फटका बसला आहे.
लोंढ्री, तांडा, ता. जामनेर येथील ललित सोमा चव्हाण, सुरेश राघो चव्हाण व संजय गबरू राठोड या तीन शेतकऱ्यांचा ६ लाख २१ हजार किमतीचा ७७ क्विंटल कापूस बनावट नंबर प्लेट असलेल्या ट्रकमधून (क्र. जीजे ०५ एव्ही २७५५) चालकाने नेला. २४ रोजी हा कापूस घेऊन ट्रकचालक गुजरातकडे रवाना झाला होता. वाहनाचे भाडे २३ हजार ठरले होते. यादरम्यान चालकाने भाड्यापोटी २० हजार रुपये मागितले. भाडे २३ हजार असताना, २० हजारांची मागणी चालकाने केल्याने विजय चव्हाण यांच्या मनात संशय आला. त्यांनी चालकाला भाड्यापोटी दहा हजार रूपये दिले. राहिलेले पैसे गुजरात येथे मिळतील, असे सांगितले.
दि. २५ रोजी संबंधित चालकाला फोन लावला. पण, फोन लागला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संशय आला. चालकाची शोधाशोध सुरू झाली. पण, तपास लागला नाही. तोंडापूर, ता. जामनेर येथील शेतकरी योगेश सुपडू पवार यांनी मालवाहतूक ट्रक संबंधित शेतकऱ्यांना भाड्याने लावून दिला. या तीनही शेतकऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता ट्रकमध्ये कापूस भरला आणि तिथेच त्यांचा घात झाला.