जळगाव : पोलिसांना कॉल करून माहिती दिल्याच्या कारणावरून सागर पुरूषोत्तम कापूरे (३२, रा. विठ्ठलपेठ, जळगाव) या तरूणाला सहा जणांकडून मारहाण सुरू होती. हा प्रकार नशिराबाद पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच संबंधित व्यक्तींकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील मन्यार मोहल्ला येथे घडली. दरम्यान, दोन्ही पोलिसांसह तरूण जखमी झाला असून याप्रकरणी सोमवारी रात्री सहा जणांविरूद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सागर कापूरे याने सोमवारी सकाळी नशिराबादच्या डायल ११२ वर संपर्क साधून मन्यार मोहल्लामध्ये काहीतरी विक्री होत असल्याची माहिती दिली होती. त्या अनुषंगाने नशिराबाद पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार हसमत अली बशीर अली सैय्यद व पोलिस नाईक सुधीर रघुनाथ विसपुते हे संबंधित ठिकाणी खात्री करण्यासाठी गेले होते. मात्र, खात्री करून पुन्हा पोलिस ठाण्याकडे जात असताना सागर कापूरे याला सहा जण पोलिसांना कॉल करून माहिती दिल्याच्या कारणावरून मारहाण करताना दिसून आले.
दोन्ही पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या हाताला मुक्कामार लागला. शेवटी विसपूते यांनी रात्री नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळूंखे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.