- भूषण श्रीखंडे जळगाव - परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेणार नाही, त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १७ रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती दिली. परीक्षेच्या कामकाजाबाबत विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८(४) मध्ये नमूद तरतुदीचे उल्लंघन करणारी असून ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही, त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. उन्हाळी २०२४ परीक्षेचे अर्ज भरण्याची मूदत संपण्यापूर्वीच हिवाळी परीक्षेचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे तसेच मूल्यांकन प्रक्रियेतील इतर सर्व घटकांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरहिवाळी २०२३ च्या ज्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत त्यांचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन, निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख, निकाल सुधारित होण्याचा कालावधी याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर NEWS AND ANNOUNCEMENTS या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाहीत, त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे असे प्रा. पाटील यांनी सांगितले.